थायलंड पोलिसांचे विमान कोसळले; ६ ठार   

बँकॉक : थायलंडमधील बीच शहराजवळ शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास एक विमान समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत सहा पोलिसांचा मृत्यू झाला. रॉयल थाई पोलिसांचे प्रवक्ते आर्चायोन क्रेथोंग म्हणाले, ’वायकिंग डीएचसी-६ ट्विन ऑटर’ विमान हुआ हिन जिल्ह्यात पॅराशूट प्रशिक्षणाच्या तयारीसाठी चाचणी घेत होते. उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. यात पाच पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. हवाई दलाचे अधिकारी विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटासह पुरावे गोळा करत आहेत. 
 
या विमान दुर्घटनेची एक चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. त्यामध्ये विमान किनार्‍यापासून १०० मीटर अंतरावर समुद्रात दिसत आहे. त्याचे दोन तुकडे झाले आहेत. हुआ हिन विमानतळाजवळ हे विमान कोसळले. दरम्यान, ११ सप्टेंबर १९९८ रोजी थायलंडमध्ये एक मोठा विमान अपघात झाला होता. 

Related Articles